Tuesday, August 26, 2014

पृथ्वी - एक अनुभव





मध्यमवर्गीय मराठी घरात वाढलेला असल्याने साहित्य, नाटक, कला यांची आवड असतेच. कळत्या नकळत्या वयात खांडेकर, फडके ते पार शिवाजी सावंत असं सर्व काही वाचलेलं असतं.
पुढे जाउन गुलजार , बच्चन , महाश्वेता देवी , टागोर भेटलेले असतात. हिंदी थिएटर आणि ड्रामा यांबद्दल वाचलेल असताना बर्याचदा पृथ्वीचं नाव ऐकलेल असतं. पृथ्वी मागची 'Concept ' ; शशी आणि संजना कपूर ची मेहनत , "फिरता रंगमंच" ते "पृथ्वी अड्डा"पर्यंतचा प्रवास, सिने, नाट्य कलावंताची तिथली उठबस , पृथ्वी कॅफे मधली  "आयरिश कॉफी " , "कटिंग चहा " हे सगळ काही वाचलेल असत, ऐकलेलं असत आणि एखाद्या पावसाळी संध्याकाळी आपण स्वतःच जाउन पृथ्वीच्या समोर उभे  राहतो.

पाऊल टाकल्या टाकल्या आपल्याला जाणवतं, इथला महोलच वेगळा आहे.नाटक , ड्रामा ,प्ले , स्क्रिप्ट , डायलोग्स , बेक्स्टेज , नेपथ्य , संवाद , रंगमंच , रंगभूषा , व्यक्तिचित्रण , कला , अभिनय या साऱ्या शब्दांनी पृथ्वीचा आसमंत नेहमीच व्यापलेला असतो नाट्यवेडाचा गंध इथल्या प्रत्येक वस्तूला आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं 'passion ' आहे ड्रामा. म्हणूनच एखादी षोडशवर्षीय कन्या "मन्तो की कहानियां " वाचत असते तेव्हा चकित व्हायला होत नाही. बुकशॉप चालवणारा युवक फावल्या वेळात नाटकातली स्वगतं  भूमिकेच्या गाभ्यात शिरून म्हणत असतो तेव्हा डोळे विस्फारत नाहीत.

इथल्या कॅफेने अनेक व्यक्तिरेखांना  जन्म दिला , अनेक नवीन 'फॉर्म्स ' आणि पटकथा इथल्या कॉफीच्या गंधाने घडत गेल्या. आजही इथे परवलीचा प्रश्न असतो "so , what's new ?". नावीन्याची ही आस पृथ्वीने अजूनही जपली आहे. आजही इथल्या टेबलांवर नाटकांना आकार मिळतो , भूमिकांना व्यक्ती मिळतात , धडपडणार्यांना व्यासपीठ मिळतं आणि रंगभूमीला नवीन विचार मिळतात .

नाविन्य आणि वेविध्य हे पृथ्वीचं वेशिष्टय. एखाद्या संध्याकाळी तुम्हाला नाटकांच्या चार्चेसोबत बासरीचे सूर ऐकू येतील , मधूनच एखाद्या गिटारच्या तारांनी छेडलेली जिंगल तुमची संध्याकाळ प्रसन्न करेल.
पृथ्वीच्या "aura"  बाहेर पडताना विचार येतो , पृथ्वी नक्की काय आहे ? एक चळवळ , एक विचार , एक व्यासपीठ ,  कि   फक्त एक थिएटर? पृथ्वी या सगळ्याच्या पलिकडे आहे. त्याला एकाच 'form' मध्ये बांधताच येत नाही … येणार नाही. प्रत्येकाला जसं आवडेल जसं भावेल तसं ते असतं आणि त्याच्या तशा असण्यातच त्याचं 'पृथ्वी'पण सामावलेलं आहे. 

2 comments:

  1. तुमच्या माझ्यातल्या सागळ्याना वाटणार कुतूहल ..आणि पृथ्वी बद्दलची आस्था ...याहून वेगळी बिलकुलच नाही . ....अप्रतिम

    ReplyDelete